• Language: मराठी
• Author: संपादक -राजेंद्र शंकर गवळी
• Category: परीक्षण (लेख)
• Publication: गवळी प्रकाशन, इस्लामपूर
• Pages: १८४
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
• ISBN: 9789381831793
शेतकरी वेदनेचा हुंकार' मराठी कथेचा संदर्भ ऐवज
'सचिन वसंत पाटील' हे अलीकडे मराठी साहित्य वर्तुळात
सातत्याने चर्चेत असलेलं एक नाव! 'अवकाळी विळखा' या कथासंग्रहानं त्यांना खूप
प्रसिद्धी दिली. स्वतःचा आयुष्यात झालेला वेदनामय अपघात, अपंगत्व, दु:ख हे सगळं पाठीवर टाकून ते हसतमुख जगतात. त्यांना आपल्या वाट्याला
प्रतिकूल परिस्थितीपेक्षा, समाजाच्या वाट्याला आलेल्या अडचणी
व वेदना महत्वाच्या वाटतात. विशेषतः दु:ख व दारिद्र्याविषयी त्यांच्या अंत:करणात
करुणा आहे. म्हणूनच त्यांनी गेल्या दोन-तीन दशकातील बदलत्या शेतीचा, प्रगत तंत्रज्ञानाचा आणि त्यायोगे शेतकऱ्यांच्या
जीवनात येणाऱ्या सुखदुःखांचा अत्यंत बारकाईने व चिकित्सकपणे अभ्यास करून 'अवकाळी विळखा' हा कथासंग्रह साकारला आहे.
या कथासंग्रहाला महाराष्ट्रातील वाचकांनी भरभरून दाद दिली. त्यांचं
कथासाहित्य वाचकांनी डोक्यावर घेतलं. कारण सचिन पाटील यांनी बदलत्या शेतीची व आधुनिक
विकासाची मांडलेली चित्रणे ही शहरीकरणाच्या दिशेने निघालेल्या प्रत्येक
गावगाड्यातील आहेत. त्यांच्या कथेत भेटणाऱ्या व्यक्तीरेखा या महाराष्ट्राच्या
कानाकोपऱ्यातील प्रत्येक खेड्यात भेटतात. म्हणूनच 'अवकाळी विळखा' वाचकांना आपला वाटतो, हे सचिनचे यश आहे. या पुस्तकावर पन्नासभर वाचकांच्या
प्रतिक्रिया लेखी स्वरूपात आल्या. त्यामध्ये काही समीक्षा लेख, काही परीक्षणे, काही रसग्रहणे तर बरेचसे अभिप्राय आले. काही कवी मित्रांचे अभिप्राय
कवितेच्या रूपाने आले. या सगळ्यातून महत्वाच्या समीक्षा लेखांची, अभिप्रायांची निवड करून इस्लामपूरच्या गवळी
प्रकाशनाचे श्री. राजेंद्र शंकर गवळी यांनी संपादित केलेले 'शेतकरी वेदनेचा हुंकार' हे पुस्तक प्रकाशित केले आहे. हे पुस्तक वाचत असताना मला डॉ. आनंद यादव
यांच्या 'गोतावळा' कादंबरीची आठवण झाली. कारण डॉ. यादव यांची ही कादंबरी
जुन्या शेतीसंस्कृतीशी निगडित आहे. शेती-शेतकरी, शेतकऱ्यांचे पशुधन, विशेषतः गाई, बैल, म्हशी, शेळ्या, कुत्री, मांजर, कोंबड्या अशा प्रकारचा शेतकऱ्यांचा गोतावळा होता.
दुसऱ्या महायुद्धानंतर औद्योगिक क्रांतीने शेतीत प्रगत तंत्रज्ञान आले.
शेतकऱ्यांच्या शेतात ट्रॅक्टर आला, विहिरीवर मोट व पाणी उपसणारे इंजिन, मोटार आली. त्यामुळे आता पारंपरिक बैलांच्या जिवावरची शेती उद्ध्वस्त होणार, असे वाटून शेतात राबणारा नारबा नावाचा गडी दुःखी
होतो. म्हणजेच त्या आलेल्या सुधारणा नाकारल्या असत्या तरी शेतकरी सुखी झाला नसता
किंवा त्याचे दैन्य संपले नसते आणि ते आधुनिकीकरण शेतकऱ्यांनी स्वीकारले, तरीही त्यांची दुःखे कमी झाली नाहीत. कारण शेतीतील
बदलांना चिकटून आलेल्या प्रगत तंत्राने उदा. अवजारे, रा. खते, जंतुनाशके यांनी शेती महागडी केली
हाती. खेळते चलन देणाऱ्या ऊसशेतीने कौटुंबिक सुधारणा झाल्या. जे शेतकऱ्याचे तेच
गडी माणसांचे. त्यांचाही भाव वधारला. त्यामुळे शेतकऱ्याच्या जमाखर्चाचा ताळेबंद
जमेनासा झाला. गावाशेजारी औद्योगिक वसाहती येऊ लागल्या. पैशाच्या हव्यासाने शेती व
शेतकरी देशोधडीला लागला. या सगळ्या नवीन बदलांचे चित्रण सचिनच्या 'अवकाळी विळखा'तून येते. डॉ. आनंद यादवांची 'गोतावळा' जुन्या कृषिसंस्कृतीचे दु:ख
मांडताना शेतीला व शेतकऱ्याला आधुनिकतेच्या उंबरठ्यापर्यंत आणते. तर सचिनच्या कथा
महागड्या आधुनिक शेतीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांचे कौटुंबिक जगणे रेखाटतात.
म्हणूनच इथे यादवांच्यानंतर मला सचिनसारखा शेतकऱ्याचा पुत्र महत्त्वाचा वाटतो.
सचिनला नियतीने अपंग केले असले तरी तो डोळस आहे. त्याच्या डोळसपणातून साकारलेल्या, 'अवकाळी विळखा' या कथासंग्रहावरील प्रतिक्रियांचे 'शेतकरी वेदनेचा हुंकार' हे पुस्तक
श्री. राजेंद्र गवळी यांनी संपादीत केले आहे.
या ग्रंथातील 'ग्रामीण जीवनाचा वेध घेणारी कथा :
अवकाळी विळखा' या लेखात उमेश मोहिते-थाटकर
लिहितात, हे पुस्तक शेतकरी वर्गाच्या समस्या
मांडते. त्यांच्या जीवनात परिस्थितीमुळे आलेली असहाय्यता, होणारी घुसमट व आपल्याच माणसांकडून होणारे शोषण
मांडते. लेखकाने ग्रामीण म्हणी व वाक्प्रचार यांचा माफक वापर करून संवादशैली व
नेटके निवेदन कौशल्य वापरले आहे. 'ग्रामीण जीवनातील समकालीन वास्तव व समस्यांचा समग्र आढावा' या लेखात डाॅ. राहुल अशोक पाटील म्हणतात, या पुस्तकातील सर्वच कथांतून लेखक वास्तव, वैचारिक, अंतर्मुख करणारा आशय मांडताना ग्रामीण जीवनातील विविध ताणेबाणे, समस्या, कष्ट, संघर्ष, प्रयत्न, समाजाचा शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, चहूबाजूने होणारे शेतकऱ्याचे शोषण आणि शासनाची उदासीनता, विविध पातळ्यांवर होणारा भ्रष्टाचार, निसर्गाचा लहरीपणा, यावर परखड भाष्य करतो. केवळ भाष्य न करता लेखक या समस्यांवरचे सूचक उपायही
स्पष्टपणे सांगतो. म्हणूनच आजच्या ग्रामीण परिस्थितीचे केवळ रडगाणे न मांडता
उपायांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणाऱ्या या कथा आहेत, हेच या कथासंग्रहाचे यश आहे.
'अवकाळी विळखा : कृषी वेदनेचा संपन्न अाविष्कार' या लेखात डाॅ. सयाजीराजे मोकाशी सांगतात, या कथासंग्रहात शेतकरी हा कथेच्या केंद्रस्थानी आहे.
बागायती परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनातील सुख-दु:खे, वृद्धांचे प्रश्न, अल्पभूधारक शेतकरी मनाची उलघाल, कष्टकऱ्यांचे भावविश्व आणि सुशिक्षित बेकारांनी शोधलेले नवे मार्ग अशी
महत्त्वाची सुत्रे यात आहेत. प्रभावी कृषी जाणीव, दमदार व्यक्तीरेखा, बदलते समाजजीवन, मानवी मनातील व्दंद्व यामुळे कथांना गती प्राप्त झाली
आहे. 'अवकाळी विळखा : शेतकरी वेदनेचा
हुंकार' या शिर्षक लेखात कथाकथनकार हिंमत
पाटील लिहितात, आजच्या खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या युगात ससेहोलपट होऊन जगणाऱ्या शेतकरी वर्गाच्या आंतरीक आत्म्याचा
सामुहिक उद्गार म्हणजे हा कथासंग्रह! हा कथासंग्रह शेतकरी वर्गाच्या व्यथा
वेदनांचा तळ धुंडाळणारा वाटतो.
'वर्तुळाबाहेरील कथा', या आपल्या लेखात रंगराव बापू पाटील
मांडतात, हा कथासंग्रह व्यक्तीविशेष, स्वभाव वैशिष्ट्यांचे अनेक पदर, बारकावे, ग्रामीण भाबडेपणा, व्यवस्थेमुळे, परिस्थितीमुळे आलेली हतबलता, मनातल्या मनात कुढुन होणारी घुसमट, इत्यादी मानवी मनाचे धागेदोरे उलगडत जातो. ओघवती शैली, बोली भाषेतील संवाद, म्हणी, हुबेहुब प्रसंग डोळ्यासमोर उभे
करण्याची लेखकाची हातोटी यामुळे हा कथासंग्रह नेहमीच्या कथालेखन वर्तुळांच्या
बाहेरचा वाटतो. 'मातीतल्या नात्यांना सावरणारा...' या लेखात सुनील जवंजाळ म्हणतात, या संग्रहातील कथा वाचकांशी बोलणार्या आहेत.
आशयपूर्ण वाक्यांनी कथेची उंची वाढते. तर आनंदा टकले 'व्यथा बळीराजाची' या लेखामध्ये लिहितात, ग्रामसंस्कृतीशी
निगडीत असणाऱ्या भावभावना, संघर्ष, समस्या, वेदना, नातेसंबंध, पाऊस, शेती, निसर्ग, जागतिकीकरण, त्याचा ग्रामसंस्कृतीवर झालेला चांगला-वाईट परिणाम आणि त्यातुन घुसमटून
निघणारे मानवी जीवन... अशा अाशयांच्या कथा म्हणजेच अवकाळी विळखा! 'शेतकऱ्यांच्या व्यथा' मध्ये प्रा. बाळासाहेब देवीकर लिहितात, बदलत्या गावगाड्याचे व जागतिकीकरणाचे वर्णन करून आणि त्यायोगे आलेली दु:खे
मांडून सचिन पाटील थांबत नाहीत तर त्या समस्यांवर उपायही सुचवतात हे फार मोलाचे
आहे. तृतीय पुरुषी निवेदनातून व बोलीतील संवादातून साकारणारी पाटील यांची कथा थेट
आशयाला भिडते.
'घुसमट : कृषीमनाच्या कोंडमाऱ्याचा प्रभावी वेदनाविष्कार' या आणखीन एका लेखात डाॅ. सयाजीराजे मोकाशी लिहितात, 'शेती हा शेतकऱ्यांचा व्यवसाय नसून ही एक त्याच्या
जीवनाची सर्वसमावेशक वृत्ती आहे. स्वतःबरोबर इतर सर्व प्राणिमात्रांना
प्रामाणिकपणे जगविण्याचा तो एक आनंददायी प्रयत्न आहे. उपेक्षित सर्व घटकांना एकत्र
करून समूह भावनेतून सर्वांसाठी तो कष्टत राहतो, हा या कथेचा खराखुरा अर्थ आहे. 'अवकाळी विळखा मधील स्त्री सहनायिका' या लेखात कल्पना पाटील म्हणतात, सचिन पाटील यांच्या कथेतील स्त्री जात्याच सोशीक आणि मदत करणारी आहे. ती
कष्टाळू, आशावादी आहे शिवाय सकारात्मक
विचारसरणीची, मनमिळावू, कोंड्याचा मांडा करून जिकिरीणे संसार चालवणारी व
परिस्थितीवर मात करून जिद्दीने जगणारी आहे. युवराज पाटील यांनी सर्वच कथांचे
सविस्तर रसग्रहण लिहिले आहे. 'हिरवे दुःख' या लेखात भारत बंडगर लिहितात, या कथासंग्रहातून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे
दुःख विशद झाले आहे. प्लॉटिंग, औद्योगीकरण, खत टंचाई, लहरी निसर्ग, दलाली, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, फसवणूक व दोन पिढ्यातील अंतर हे या
संग्रहाचे टोकदार विषय बनले आहेत.
या पुस्तकात काही अभिप्रायही आले आहेत यामध्ये ज्येष्ठ लेखक द. ता. भोसले
लिहितात, 'सचिन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी
झुंज घेत नव्हे तर त्या परिस्थितीला पराभूत करीत तुम्ही जो आदर्श उभा केला आहे
त्याला तुलना नाही. तुम्ही मृत्यूचा पराभव केला आहे आणि जगणं कसं आनंदित करायचे
याचा आदर्श घालून दिला आहे.' प्राध्यापक
सुनील तोरणे लिहितात, लेखक उणे शून्य कधीच होत नसतो, त्याच्या लेखणीने काळावर आपलं नाव कोरलेलं असतंच, ते काम सचिन पाटील यांनी 'अवकाळी विळखा' या कथासंग्रहातून केले आहे. चंद्रपूरच्या अरुण घोरपडे यांनी या
कथासंग्रहातील कथा पाठ्यपुस्तकात यायला पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
सचिन पाटील यांचा सर्व लेखन प्रवास थक्क करणारा आहे. सचिनला मी बारा
वर्षांपासून ओळखतो. त्याचा प्रवास वाचताना डोळ्यांच्या कडांना अश्रुंचा पाझर
सुटल्याशिवाय राहात नाही. नियतीने सचिनवर खूप मोठा अन्याय केला. न पेलणारा प्रहार
केला. दोन्ही पाय कायमचे निकामी केले. तरीही सचिन जीवनात आलेल्या वादळांशी झुंज
देत उभा राहिला. त्या वादळांवर त्याने लेखणीचा वार केला. त्या वाराने त्याच्या
जीवनात उठलेल्या दुःख वेदनांनी माघार घेतली. साहित्याच्या वारूवर स्वार होत सचिन
आपल्या लेखनीनेच लढत राहिला. साहित्य शारदेने त्याच्या जिद्दीचे स्वागत केले आणि
त्याच्या हाती 'अवकाळी विळखा' सारखे सुगंधी पुष्प दिले. पण ही लढाई सोपी नव्हती या
लढाई पाठीमागचा इतिहास आपण सर्वांनी जाणून घेतला पाहिजे. हे पुस्तक प्रकाशित
करताना त्याला अनंत अडचणी आल्या. अनेक प्रकाशकांनी नकारघंटा वाजवली. काहींनी
पैशाची मागणी केली. औषध पाण्याच्या खर्चामुळे बेजार झालेला सचिन ही मागणी पूर्ण
करू शकत नव्हता. बऱ्याच ठिकाणाहून 'साभार परत' ची पत्रे आली. या सर्व व्यवहारात
उमेद न सोडता सचिन आशावादी राहिला. काही दिलासा देणारीही माणसे भेटली, त्यापैकीच राजेंद्र गवळी हा माणूस. त्यांच्या गवळी
प्रकाशनाच्या वतीने 'अवकाळी विळखा' हा कथासंग्रह प्रकाशित झाला. अवकाळी... कथासंग्रह
वाचकांच्या दरबारात आला आणि वाचकांनी या पुस्तकाचं भरभरून कौतुक केलं. हे पुस्तक
अल्पावधीतच लोकप्रिय, वाचकप्रिय, समाजप्रिय झालं. महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवर
साहित्य संस्थांचे पुरस्कार या पुस्तकाला मिळाले. या कथासंग्रहामुळेच
साहित्यवर्तुळात सचिन पाटील हे नाव पृष्ठभागावर आले आणि अग्रक्रमांवर विराजमान
झाले. तरीही मला राहून-राहून हा प्रश्न पडतो की, या पुस्तकाला राज्य मान्यता का मिळाली नाही? या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार का मिळाला नाही? खरेतर 'अवकाळी विळखा'ला यापूर्वीच राज्य पुरस्कार
मिळायला पाहिजे होता. एवढेच नाही तर साहित्य अकादमी पुरस्कारापर्यंत हे पुस्तक
पोहोचायला पाहिजे होते. त्या योग्यतेचे लिखाण या पुस्तकातून नक्कीच झाले आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक
शेतकऱ्यांना जगण्यासाठी दिलासा देणारे आहे. शेतकऱ्यांच्या हातून होणाऱ्या चुका
सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणारे आहे. वर्तमानातील शेतकऱ्यांच्या शेतीची आणि
वेदनांची गंभीरपणे दु:खे 'अवकाळी विळखा' कथासंग्रहात मांडली आहेत. सचिनची कथा शेतकऱ्यांच्या
नव्या पिढीला दिशा देणारी आहे म्हणूनच या संग्रहातील 'कष्टाची भाकरी' ही कथा सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे बी. ए. भाग एक च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. त्याबद्दल
विद्यापीठाचे आभार, सचिनचे मन:पुर्वक अभिनंदन!
शिवाय गेल्या दोन दशकातील मराठी कथा आज कोणत्या वळणावर आहे, त्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही राजेंद्र
गवळी यांनी संपादित केलेला 'अवकाळी
विळखा : शेतकरी वेदनेचा हुंकार' हा ग्रंथ
संदर्भासाठी उपयुक्त ठरणार आहे आणि त्यादृष्टीने भविष्यात सचिन पाटील यांच्या
कथांचे मूल्यमापन होईल असा आशावाद व्यक्त करतो.
सचिनच्या साहित्य वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!
- श्री.दि.बा.पाटील, कामेरी, सांगली