• Book name: आनंदयात्रा – माझी जीवन
गाथा
• Language: मराठी
• Author: शरदकुमार घोडके
• Category: आत्मचरित्र
• Publication: समीक्षा प्रकाशन
• Pages: ८६
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कसे आहे हे सांगणे आणि कळणे मानवी मनाच्या पलीकडे आहे. ते फक्त आणि फक्त सत्पुरूषच सांगू शकतात. एखाद्या सामान्य, अडाणी माणसाचे आयुष्यही खूप प्रेरणादायी असू शकते. त्यासाठी त्याने शिक्षण घेतलेच पाहिजे असे नाही पण, ते त्याला व्यक्त न करता आल्याने इतरांपर्यंत पोहचू शकत नाही.
शिक्षणाची गंगा गोरगरीब मुलापर्यंत नेणारे कर्मवीर भाऊराव पाटील कोणत्या शाळेत शिकले होते? तर अनुभव हा त्यांचा गुरू होता. म्हणून तर त्यांनी कमवा आणि शिका हे तत्व राबविले.
सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट पहिल्यांदा सर करणारा शेरपा तेनसिंग नोर्गे कोणत्या शाळेत शिकला होता? तर निसर्ग ही त्याची शाळा आणि अनुभव हा त्याचा गुरू होता.
एक हजार शोध लावणारा थोर शास्त्रज्ञ थॉमस आल्वा एडिसन याला तर शिक्षकांनी काही येत नाही म्हणून शाळेतून हाकलून लावले होते. अशी अनेक थोर व्यक्तिमत्व आहेत, की ज्यांना शाळेचा गंध सुद्धा नव्हता.
लहानपणी माझीही निसर्ग ही शाळा आणि अनुभव हा गुरु होता. त्यामुळेच शाळेतल्या बंदिस्त आणि पुस्तकी शिक्षणापेक्षा निसर्गात स्वच्छंदीपणे, मुक्तपणे फिरणे मला आवडले त्यातून माझे व्यक्तिमत्व घडत गेले.
कोणतीही गोष्ट बळजबरीने केल्याने चांगली होत नाही. स्वयंप्रेरणेनेन केल्यास ती नकळत घडून येते. त्यासाठी कष्ट पडत नाहीत. मी जी प्रत्येक गोष्ट शिकलो ती स्वयंप्रेरणेनेच. त्यात कृत्रिमपणा नव्हता. एका सामान्य शिक्षकाचा सामान्य मुलगा कसा घडला हे सर्वांना कळावे म्हणून मला हे पुस्तक लिहावे असे वाटले. माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत योगदान देणारे माझे 'आईवडील', गुरूजन आणि मित्र परिवार यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला हे लिहावे असे वाटले.
त्यासाठी मला प्रेरणा मिळाली ती प्रा. डॉ. राजन गवस सरांच्या भाषणाने. माझे हे मनोगत सर्वांना प्रेरणादायी ठरावे अशी माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंना कळकळीची प्रार्थना आहे.
- श्री. शरदकुमार विठठल घोडके (शेणगांव)