• Language: मराठी
• Author: प्रा.साईनाथ पाचारणे
• Category: समीक्षा
• Publication: सप्तर्षी असोसिएटस् अँड पब्लिकेशन
• Pages: ८८
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
• ISBN: 9789387939660
साहित्य आणि समीक्षा यांचे संबंध, साद-पडसादासारखे क्रिया-प्रतिक्रियेसारखे असतात. साहित्यकृती ही लेखकाची वैयक्तिक निर्मिती असली तरी तिला सामाजिक, सांस्कृतिक परंपरांचा आधार असतो. त्यामुळे जरी ती स्वायत्त असली तरी अनेक नात्यांनी व धाग्यांनी समाज जीवनाशी जोडलेली असते. ती व्यक्तिसापेक्ष असूनही तिला वस्तुनिष्ठ अस्तित्व असते. त्यामुळे साहित्यकृतीच्या गुणावगुणांचा शोध घेताना समीक्षकाचाही कस लागतो. वाचकाच्या भूमिकेतून तो साहित्यकृतीचा आस्वाद घेतो तर समीक्षकाच्या भूमिकेतून तो मूल्यमापन करतो.
प्रा.साईनाथ पाचारणे, हे नीरक्षीर
विवेकी न्यायाने समीक्षा करणारे समीक्षक म्हणून सुपरिचित आहेत. कथा, कविता, कादंबरी, नाटक यांसह अन्य साहित्य
प्रकारातील साहित्यकृतींची क्ष-किरण तपासणी करून त्यातील मर्म आणि वर्म शोधण्यात
त्यांचा हातखंडा आहे. नव्या पिढीतील कथाकार सचिन वसंत पाटील यांच्या 'अवकाळी विळखा' आणि 'सांगावा' या कथासंग्रहातील कथांची एकत्रित समीक्षा करून त्याचे
साक्षेपी मूल्यमापन केले आहे. त्यांच्या कथांचा आस्वाद वाचकांना वेगवेगळ्या
दृष्टीने घेता यावा यासाठी कथेच्या अंगभूत घटकांच्या अनुषंगाने ही दीर्घ समीक्षा
आली आहे. कथांतील अंतर्भूत सौंदर्य स्थळांचा शोध घेऊन वाचकांपुढे ठेवण्याचे
समीक्षकाचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे.
खेडी आता बदलू लागली आहेत, असा
निष्कर्ष काढणाऱ्या दंतकथांना फाटा देऊन हे अर्धसत्य आपल्या कथांतून अविष्कृत
करणाऱ्या सचिन पाटील यांच्या कथांची आस्वादक समीक्षा आपल्याला या ग्रंथात वाचावयास
मिळते. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, संक्रमणाच्या
वाटेवरील बदलाची नोंद घेण्याची हातोटी, नव्या-जुन्यातील मूल्य संघर्ष, माती आणि मूल्यांची पाठराखण करण्याची सजग भूमिका यांच्या नोंदी घेत कथांचे
संश्लेषण आणि सुसूत्र विश्लेषण 'ग्रामीण
मिथकाचे अर्धसत्य मांडणाऱ्या कथा' या समीक्षा
ग्रंथात अवलोकनात येते.
मूल्यसंस्कार, मनोबल वाढवणारे घटना-प्रसंग, ग्राम्यबोलीचा प्रभावी वापर, सदृढ आणि सबल मनाची पात्रे ही बलस्थाने अधोरेखित करून
व्यष्टी आणि समष्टी व्यापून टाकणाऱ्या कथांचे आणि त्याला जन्म देणाऱ्या लेखकाचे एक
प्रकारे कौतुकच समीक्षकाने केले आहे. वास्तविक समीक्षक हा गुणावगुणांची साधक-बाधक
मांडणी करीत असतो, नव्हे हे त्याचे कर्तव्यच असते.
येथेही तसेच घडले आहे. सचिन पाटील यांच्या दोन्ही कथासंग्रहातील कथांमधून
आढळणाऱ्या कथेच्या अंगोपांगाची घुसळण करून त्याचा अर्क या ग्रंथात आलेला आहे.
बदलत्या कालप्रवाहाचे दर्शन घडवणारी कथानके, बहुरंगी आणि बहुढंगी पात्रे, बळीराजाच्या आणि ग्रामीण समूहाच्या समस्यांचा अविष्कार, हरवत चाललेल्या नात्यातील दुरावा, दोन पिढ्यातील संघर्ष, स्त्री जीवनातील असहाय्यता अशा ग्रामीण आणि शेती संस्कृतीतील घटना, घडामोडींचा ठाव घेत कथा मूर्त झालेल्या दिसतात, याचे चिकित्सक विश्लेषण या ग्रंथामध्ये श्री पाचारणे
यांनी केलेले जाणवते. कथांतून अवतीर्ण झालेला निसर्ग, कथेतील भाषासौंदर्य, वातावरण या अनुषंगाने त्यांची चिकित्सा करण्यात आली आहे. कथेतील बलस्थाने व
कथा लेखकाच्या लेखन मर्यादांची चर्चा स्वतंत्र प्रकरणात केली असून लेखक मुलाखतीतून
कथा लेखनाबाबतची भूमिका, निर्मीतीस्थाणे, साहित्य निर्मितीची प्रेरणा, दृष्टी, संदेश जाणून घेण्याचा सफल प्रयत्न केलेला आहे.
कधी आस्वादकाच्या भूमिकेतून तर कधी मनोविश्लेषणाच्या माध्यमातून ही समीक्षा
आकारात आली असून सचिन पाटील यांच्या कथा साहित्याची फोटो काॅपीच आपणांस या समीक्षा
ग्रंथात प्रतिबिंबित झालेली दिसते. साक्षेपी मांडणी, चिकित्सक विश्लेषण, शास्त्रीय भाषेचा वापर आणि
संशोधनाची वेगळी दृष्टी यांमुळे 'ग्रामीण
संक्रमनाच्या मिथकाचे अर्धसत्य मांडणाऱ्या कथा' हा ग्रंथ एकविसाव्या शतकातील कथा साहित्यातील महत्त्वपूर्ण समीक्षाग्रंथ
आणि मौलिक ऐवज ठरेल याची खात्री वाटते.
- डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक, राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखक.