• Book name: रुमणपेच
• Language: मराठी
• Author: सु.द.घाटे
• Category: कथासंग्रह
• Publication: गणगोत प्रकाशन
• Pages: १७६
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
प्रा.सु.द.घाटे यांचा 'रुमणपेच' हा कथासंग्रह मराठी कथाविश्वात दाखल होत आहे. टोकाच्या श्रद्धेच्या आणि अंधश्रद्धेच्याही गाळात रुतलेल्या, ग्रामीण माणसांच्या या कथा आहेत. स्वतःच निर्माण केलेल्या रुमणपेचात अडकलेली ही माणसं आपापल्या जगण्याच्या तत्त्वज्ञानावर ठाम आहेत. वाचकांना अस्वस्थ करणाऱ्या या कथांमध्ये अपरिचित पण मायबोलीतील खास मराठवाडी शब्दांनी रंगत आणली आहे.
आदिवासी, कष्टकरी, मजूर, मेंढपाळ, गुराखी आणि उपेक्षितांचं वास्तव जगणं हे या कथांचं बलस्थान होय. या कथांमधील काही पात्र स्वाभिमानाने जगतात. दाणादाणा गोळा करून, परडी भरण्याची कामसू वृत्ती या कथांमधील नायिकांमध्ये आढळते. पण दुर्देव त्यांची पाठ सोडत नाही अन् त्यांना पुरेसे अन्नही मिळत नाही. परिणामी आईचे दूध आटून जाते, अन् बालकं कुपोषणाला बळी पडतात. ग्रामीण माणसांच्या वृत्ती-प्रवृत्तीला अधोरेखित करण्यात लेखक प्रा.सु.द.घाटे यांना चांगलेच यश मिळाले आहे.
-देवीदास फुलारी, नांदेड