• Book name: किनार
• Language: मराठी
• Author: प्रा.सुरेखा मत्सावार
• Category: कथासंग्रह
• Publication: गणगोत प्रकाशन
• Pages: ९६
• Binding: पेपरबॅक बाइंडिंग
• ISBN: 9788194569756
'लाईफ स्टाईल'
सुट्टीत कुठे टूरला जाणार? कुठे गेला होतात? हा प्रेस्टीज पॉईन्ट असतो. एखाद्या सुट्टीत काही नातेवाईकांना बोलावून त्यांच्यासोबत सुट्टी आनंदात बालवता येते किंवा घरच्या घरी कार्यक्रम आखता येतात. तसेही दररोज प्रत्येक जण आपापल्या टाईमटेबलनुसार धावत असतात, तर शांतपणे घरच्या साऱ्या सभासदांनी मिळून काही करणे, हे सुद्धा कितीतरी आनंददायक ठरते. अगदी जवळपास असणाया ठिकाणी १/२ दिवस राहायला जाणे, हे सुद्धा मजेशीर होते, पण नाही, लाखो रुपये खर्चुन प्रेक्षणीय ठिकाणी जाणे हे, सुट्टीमध्ये झालेच पाहिजे. सुट्टीत कुठे जायचे? हे दोन/तीन महिने आधीच ठरवून बुकींग केले जाते. यात काही चूक आहे असे माझे म्हणणे नाही. मुलांचे वाढदिवस किंवा हळदी-कुंकू या व्यतिरिक्त काही आनंददायक असू शकते, हे मानायलाच तयार नसतात, हळदी-कुंकवाच्या दिवशी पार्लरमध्ये आऊल तयार होऊन यायचे! वडा-पाव किंवा दोश्याची गाडी बोलवायची, इ.इ. हळदीकुकापेक्षा इतर गोष्टींना जास्त महत्त्व, मग काहीच्या गप्पा रंगतात, इतरांकडे दुर्लक्ष होते.
सर्वांचे लक्ष वेधून घेणे, हे सर्वात महत्त्वाचे; मग ते विचित्र ड्रेस घालून असू दे किंवा एखादी काही तरी वेगळीच अशी ऑड हेअर स्टाईल करून ! मग ती केश रचना कोणत्या पार्लरमध्ये केली? किती कॉस्टली आहे, इत्यादी.
खाद्य पदार्थांचेही तेच. कुठे कोणता पदार्थ चांगला मिळतो? हल्दीरामकडून आणायचे का? स्वीट आणायचे तर चितेळेचेच आणूयात! इ. इ. सणावाराला गोड काय करायचे? याची चर्चा आधीच्या पिढीत सुद्धा व्हायची, पण आता कुठून काय आणायचे, याची चर्चा होते. त्यानुसार सणावाराचे जेवण ठरते. असेच सण साजरे करणे कितपत योग्य ठरणार? नव्या पिढीला-यानंतरच्या घरी स्वीट-गोडधोड कसे बनवितात? हे समजणारच नाही, गोड पदार्थ खायचा-सणवार साजरा करणार म्हणजे अमुक पदार्थ कुठे चांगला मिळतो, हे सर्च करून ऑर्डर करणार!
घरी कोणाला नाश्त्यासाठी अथवा जेवणासाठी बोलावले तर पार्सल मागवायचे, ऑर्डर करायचे, नाहीतर त्यांना हॉटेलमध्ये घेऊन जायचे. घरी बोलावून आदरातिथ्य करायचे, हे बहुधा पुढच्या पिढीला माहीत होणार नाही. असे काही करणे तर दूरच.
हल्ली कितीही जवळचे नातेवाईक आपल्याकडे येणार असले तरी, त्यांना घ्यायला स्टेशनवर जाणे किंवा त्यांना पाठवायला स्टेशनवर जाणे, हा प्रकार राहिलेलाच नाही. दारातून किंवा बाल्कनीतून खाली जाणाऱ्यांना 'बाय बाय' केला की झाले.
आमच्यावेळी फार जुन्या काळात नव्हे, तर एक दहापंधरा वर्षापूर्वी एखादी सवाष्ण आपल्याकडे आली तर ती परत जातांना कुंकू लावण्याची प्रथा होती, आता ऑऊटटेड मानली जाते. सवाष्णीला साडी द्यायची तर त्यासोबत ब्लाऊज पीस आणि ओटीचे आणलेल्या पाकीट दिले जायचे. आता फक्त साडी, कॅरीबॅगमध्ये किंवा दुकानातून बॉक्समध्ये दिल्या जाते. साडीमध्ये ब्लाऊजपीस असतेच आणि ओटीचे पाकीट काही कंपलसरी नसते.
संध्याकाळी देवापुढे दिवा लावला जायचा. घरातल्या छोट्यांना घेऊन शुभंकरोती व्हायचे. त्यामुळे मुले खेळ संपवून हातपाय धुऊन फ्रेश होऊन यायची! कारणानिमित्ताने बाहेर गेलेल्या स्त्रिया दिवेलावणीच्या आत परत यायच्या! पण आता देव्हाऱ्यात छोटासा बल्ब असतोच, त्यामुळे दिवा लावायची गरज नाही, वृंदावन नसतेच! काही घरात बाल्कनीत तुळस लावलेली कुंडी असते. तुळशीपुढे दिवा लावणे घडतच नाही, कारण आताची लेटेस्ट लाईफ स्टाईल.'
संध्याकाळी कुठेतरी टाईमपास केला जातो, कुणी मैत्रीण गप्पा मारायला येते. नव्या लाईफ स्टाईलमध्ये रेडीमेड कपडे असतात. वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. फॅशन बदलेल तसे निरनिराळे खरेदी केले जातात. मुलाचे म्हणजे भावाचे वगैरे टीशर्ट मुलींनी घातले तरी चालतात.
पिकला आजच्या काळात टेबलावर जेवण-जेवणातील सारे पदार्थ टेबलावर ठेवले जातात. ज्यांना जे हवे ते वाढून घेतात, त्यामुळे उष्टे, खरकटे असे काहीच पाळले जात नाही. तसे करण्यात स्वच्छता हा सुद्धा एक दृष्टिकोण होता, हे मानले जात नाही. जेवणाच्या हातानेच लागेल ते घेतले जाते. मला मात्र हे स्टाईल म्हणूनही आवडत नाही. खरकटे हाताने हवे ते घेणे पटत नाही, अर्थात पिढीतील अंतर मलाही मान्य आहे.
'लाईफ स्टाईल' म्हणून स्वतःच्या लहरीनुसार वागणे, हा त्या शब्दाचा चुकीचा अर्थ घेणे होते.